
हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत असून यामध्ये राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये याठिकाणीही हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात करण्यात येत आहेत.
वाचन संस्कृतीला अधिक गतिमान बनवावे - ॲडव्होकेट डॉ. गायत्री पाटील, प्राचार्य
वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यातील वाचनसंस्कृतीला बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमामुळे तरुण पिढीमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल, ज्यामुळे त्यांचा ज्ञानाचा आवाका वाढेल आणि त्यांना नव्या क्षितिजांचा शोध घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. वाचनाची सवय फक्त शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे, तर सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे वाचनाच्या या प्रवासात प्रत्येक विद्यार्थ्याने आपले योगदान द्यावे आणि वाचन संस्कृतीला अधिक गतिमान बनवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
“वाचन हे समृद्धीचे दार उघडते” - सायली ठाकूर, सहायक प्राध्यापक
“वाचन हे समृद्धीचे दार उघडते” या विश्वासावर आधारित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यातील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या अभियानाचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकांना वाचनाची गोडी लावणे व नव्या ज्ञानाच्या दारात प्रवेश देणे आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या वाचन कौशल्यांचा विकास करणे आणि विविध पुस्तकांचा अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर घालणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वाचन केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नाही, तर ते विचारांना प्रगल्भ बनवून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही महत्त्वाचे ठरते. वाचनाच्या माध्यमातून नवीन कल्पना, दृष्टिकोन, आणि विचारसरणी यांची ओळख होते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू समृद्ध होतात.
विद्यार्थ्यांनी आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या आहारी न जाता ग्रंथाचे वाचन करावे. ग्रंथच आपल्या जीवनाला आकार देतात. आपल्या व्यक्तिमत्व विकासाला प्रेरणा देण्याचे काम ग्रंथ करीत असतात.
वाचन सवयीने व्यक्तिमत्त्व विकास, चिंतनशीलता आणि सर्जनशीलता याला चालना मिळते. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमध्ये विविध वाचन सत्रे, पुस्तक परिचय, ग्रंथदिंडी, वाचन स्पर्धा आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्राला ग्रंथप्रेमींचा इतिहास लाभलेला आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम या वारशाला पुढे नेण्याचा संकल्प आहे. चला एकत्र येऊ आणि वाचनसंस्कृतीला नवे बळ देऊ!
“वाचूया, समृद्ध होऊया!”
0 Comments