मुंबई : 'इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्कुलर अँड इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी' (ISVIR) महाराष्ट्र शाखेने २०२५-२६ वर्षासाठी आपली नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश मुंडादा यांच्या देखरेखीखाली ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून अत्याधुनिक विना-शस्त्रक्रिया (Non-Surgical) उपचार पद्धती समाजातील तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
नूतन कार्यकारिणी आणि पदे :
अध्यक्ष: डॉ. अविनाश गुट्टे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय, मुंबई)
सचिव: डॉ. शिवाजी पोळे (विभाग प्रमुख, एमजीएम रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर)
उपाध्यक्ष: डॉ. विवेक उकिरडे (प्राध्यापक, सायन रुग्णालय, मुंबई)
नवनियुक्त अध्यक्ष (President-Elect): डॉ. यादव मुंडे (विभाग प्रमुख, रुबी हॉल क्लिनिक, पुणे)
कोषाध्यक्ष: डॉ. तेजस सदावर्ते (जीएमसी, नागपूर)
सह-सचिव: डॉ. पृथ्वीराज जाधव आणि डॉ. स्वेनिल शाह (कोल्हापूर)
यासोबतच मुंबई, नागपूर, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
१९९७ मध्ये स्थापन झालेली ISVIR ही संस्था आज १,२०० हून अधिक सदस्यांसह विना-शस्त्रक्रिया (Interventional Radiology) उपचारांमध्ये क्रांती घडवत आहे. 'पिनहोल' तंत्रज्ञानाद्वारे मेंदूतील गाठी, व्हेरिकोज वेन्स आणि कॅन्सरवर प्रभावी उपचार करणे आता सोपे झाले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे प्रगत उपचार उपलब्ध करून देणे आणि नवीन डॉक्टरांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे, हे या कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रगत व सुरक्षित उपचार पद्धत असून, यामध्ये मोठ्या शस्त्रक्रियेऐवजी सूक्ष्म प्रक्रियेद्वारे अनेक गंभीर आजारांवर प्रभावी उपचार शक्य होतात. मात्र, या उपचारांबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने अनेक रुग्ण या सुविधांपासून वंचित राहतात. हीच दरी भरून काढण्याचे काम ISVIR महाराष्ट्रच्या नव्या कार्यकारिणीमार्फत केले जाणार आहे.
नूतन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली राज्यभर जनजागृती कार्यक्रम, वैद्यकीय कार्यशाळा, ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये आरोग्य शिबिरे तसेच डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच शासन व आरोग्य विभागाशी समन्वय साधून विना-शस्त्रक्रिया उपचार अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ISVIR महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “कमी वेदना, कमी खर्च, लवकर बरे होणे आणि रुग्णालयात कमी कालावधीमध्ये विना-शस्त्रक्रिया उपचारांचे प्रमुख फायदे आहेत. हे फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
या नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून महाराष्ट्रात इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि रुग्णसेवेत गुणात्मक बदल घडून येईल, असा विश्वास यावेळी अध्यक्ष: डॉ. अविनाश गुट्टे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय, मुंबई) यांनी व्यक्त केले आहे.

0 Comments