मुंबई : महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम, १९८१ यामधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अनुक्रमे राज्यातील विविध माथाडी मंडळे व सुरक्षा रक्षक मंडळे यांच्यावर आहे.
राज्यातील माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांमधील कामकाजाचे स्वरुप जबाबदारीचे व संवेदनशील आहे. सदर मंडळांची स्थापना होऊन जवळपास ४० ते ५० वर्षे होऊन गेलेली आहेत. सदर मंडळांमध्ये तत्कालीन परीस्थितीमध्ये वर्ग-२, वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भरण्यात आलेली होती. सदर पदावर नियुक्त झालेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना एकाच पदावर १५ ते २५ वर्षाचा कालावधी उलटुन गेलेला आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे निर्दशनास आलेले आहे. एकाच पदावर प्रदीर्घ कालावधीत काम करणारे कर्मचारी व त्यांच्या कालावधीबाबत विविध स्तरावरुन तसेच कामगार संघटनांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. अशा स्वरुपाच्या संवेदनशील कामकाजामध्ये सुलभता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून सदर कर्मचाऱ्यांच्या विहीत कालावधीत एका मंडळातुन दुसऱ्या मंडळामध्ये बदल्या करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
माथाडी मंडळे व सुरक्षा रक्षक मंडळे यांच्या कामकाजात एकसुत्रीपणा व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीकोनातुन, तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार यापुढे माथाडी मंडळे व खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व नियमित कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निश्चित केले आहे. त्यास अनुसरुन सदर कर्मचाऱ्यांची बदलीने एका माथाडी मंडळातून इतर माथाडी मंडळात व एका खाजगी सुरक्षा रक्षक मंडळातून इतर खाजगी सुरक्षा रक्षक मंडळात नेमणूका करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच खाजगी सुरक्षा रक्षक मंडळातुन माथाडी मंडळात आणि माथाडी मंडळातुन खाजगी सुरक्षा रक्षक मंडळात प्रतिनियुक्तीने नेमणूका करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग-२ व वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांच्या माथाडी व खाजगी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तसेच माथाडी व खाजगी सुरक्षा रक्षक मंडळातील कर्मचाऱ्यांच्या कामगार कल्याण मंडळामध्ये समकक्ष पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूका करण्यास सुध्दा शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहु बदल्या/प्रतिनियुक्तीने नेमणूका ह्या खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन करण्यात येणार आहे, असे परिपत्रक कामगार विभागाने दि. २६/०६/२०२४ रोजी काढले आहे.
१. एका माथाडी मंडळातून दुसऱ्या माथाडी मंडळात तसेच एका खाजगी सुरक्षा रक्षक मंडळातून दुसऱ्या खाजगी सुरक्षा रक्षक मंडळात बदलीने नियुक्ती करण्यात येतील.
२. माथाडी मंडळातून खाजगी सुरक्षा रक्षक मंडळात तसेच कामगार कल्याण मंडळात प्रतिनियुक्तीने नेमणूका केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा त्यांच्या मूळ कार्यालयामध्ये अबाधित राहतील.
३. बदलीने/प्रतिनियुक्तीने नेमणूका दिलेल्या कर्मचाऱ्यांची मूळ आस्थापना ही त्यांच्या सेवेतील मूळ नियुक्तीचे कार्यालय राहील.
४. प्रस्तुत बदल्या/प्रतिनियुक्तीने नेमणूका या प्रत्येक महसुली विभागांतर्गत असलेल्या माथाडी व खाजगी सुरक्षा रक्षक मंडळे तसेच कामगार कल्याण मंडळांच्या विभागीय कार्यालयांतर्गत महसुली विभागानिहाय करण्यात येतील.
५. सह आयुक्त (माथाडी) तसेच कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई यांनी सर्व कार्यालये/ मंडळांकडून प्रतिनियुक्तीने नेमणूका करण्याबाबतचे प्रस्ताव मंडळ/कार्यालयनिहाय शासनास सादर करावे.
६. सदरची प्रतिनियुक्ती ऐच्छीक स्वरुपाची राहील.
७. अशा प्रकारे प्रतिनियुक्तीने बदली केल्यामुळे सदर कर्मचाऱ्यास प्रतिनियुक्तीच्या पदावरील कोणतेही सेवाविषयक हक्क कायमस्वरुपी प्राप्त होणार नाहीत.
८. सद्यस्थितीत मंडळांच्या क्षमतेनुसार माथाडी मंडळे, खाजगी सुरक्षा रक्षक मंडळे व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात कार्यरत असलेल्या समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत आहे. तरी अशा स्वरुपाच्या कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नेमणूका झाल्यास असे कर्मचारी घेत असलेले वेतन व भत्ते संरक्षित राहतील.
९. अशा कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने नेमणूका करण्यासाठी माथाडी व खाजगी सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांचा ठराव/सहमती घेणे बंधनकारक राहील. १०. उपरोक्त नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहुन मंडळांतील कर्मचाऱ्यांच्या बदलीने/प्रतिनियुक्तीने प्रस्ताव शासनास सादर करावेत.
0 Comments