आस्थापनांकडून वेतन नियमित वसूल करणे हे सुरक्षा रक्षक मंडळ अध्यक्ष , प्रशासनाचे उत्तरदायित्व आहे. त्याच बरोबर सुरक्षा रक्षकांना वेतन वेळेवर देणे हे देखील सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्तव्य /जबाबदारी आहे. - सुधीर दाणी, संघटक (सजग नागरिक मंच, नवी मुंबई)
मुंबई : एकीकडे ठाणे व बृहन्मुंबई सुरक्षा रक्षक मंडळातील कर्मचारी -अधिकाऱ्यांचे वेतन १ तारखेला व सुट्टी असल्यास एक दिवस आधी वेतन केले जात असताना दुसरीकडे बोर्डाचे जे ४०० सुरक्षा रक्षक एमटीएनएल मध्ये कार्यरत आहेत त्यांना मागील ४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही . माहे नोव्हेंबरचे वेतन सुरक्षा रक्षकांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झालेले असून डिसेंबर ते मार्च या महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे.
काही सुरक्षा रक्षकांनी हि बाब सजग नागरिक मंचाच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर २५ एप्रिल रोजी मंचाच्या सदस्यांनी काही सुरक्षा रक्षकांसह बोर्डाच्या अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आणि प्रलंबित वेतन तातडीने प्राप्त होण्यासाठी नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली . सदरील प्रतिनिधींना याबाबत एमटीएनएल प्रशासनाला नोटीस देऊन लवकरात लवकर वेतन देण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन अध्यक्षांनी दिले.
ठाणे-बृहन्मुंबई सुरक्षा मंडळाचे सिडको, म्हाडा , बीपीसीएल , म्हाडा , एमटीएनएल , एमएसईबी अशा तब्बल ११०० शे आस्थापनात सुमारे २४ हजार सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत . नवी मुंबई सह विविध शहरांमध्ये अल्प वेतनावर कुटुंब चालवणे तारेवरची कसरत असताना विलंबाने मिळणाऱ्या वेतनामुळे कर्जाच्या हप्त्यात अडथळा, पाल्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यात अडथळा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे व त्याच बरोबर काही सुरक्षा रक्षकांचे कौटुंबिक संबंध धोक्यात आल्याची बाब सुरक्षा रक्षकांनी अध्यक्षांच्या समोर मांडली.
एमटीएनएल ची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने वेतन नियमित होत नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे . यात तथ्य आढळत नाही कारण एमटीएनएलच्या कर्मचारी -अधिकाऱ्यांना नियमित वेतन मिळते आहे . आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या मुंबई महानगरपालिका देखील सुरक्षा रक्षकांचे वेतन नियमित करत नसल्याचे गाऱ्हाणे सुरक्षा रक्षकांनी मंचासमोर मांडलेले आहे . बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांचे वेतनाची तारीख फिक्स करा व वेतन नियमित करण्यासाठी बोर्डाने सरकारकडून ' रिजर्व्ह फंड ' स्थापन करणे , आस्थापनांना वेतनाची रक्कम बोर्डाकडे जमा करण्यासाठीचा कालावधी फिक्स करणे , वेळेवर वेतन न देणाऱ्या आस्थापनांवर कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही करणे व तत्सम ज्या ज्या उपाययोजना करणे शक्य आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी निवेदनातून केलेली असल्याचे समजते . त्याच बरोबर सुरक्षा रक्षकांना दिला जाणारा गणवेश , शूज , रेनकोट यांचा दर्जाच्या बाबतीत मंडळाने तडजोड करू नये , खरेदीतील भ्रष्टाचाराला आळा घालावा याबाबत देखील मंडळाला अवगत केले असल्याची माहिती भीमराव जामखंडीकार यांनी दिली.
0 Comments