Business

मंगलचरणम् फाऊंडेशनच्या वतीने गडचिरोलीच्या प्रा. विद्या कुमरे यांना “कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार” जाहीर

 


गडचिरोली : समाजप्रबोधनासाठी कविता आणि लेखनाच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या प्रा. विद्या कुमरे यांना खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जळगाव येथे मंगलचरणम् फाऊंडेशनच्या वतीने २०२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा कौतुक सोहळा तसेच समाजाच्या नाव उंचावणाऱ्या व्यक्तीचे सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम होणार असून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. 

फाऊंडेशनचे सचिव जावेद शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "प्रा. कुमरे या अत्यंत मागासलेल्या भागातून, विशेषतः गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून, समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी कविता आणि लेखनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांचे लेखन सामाजिक संवेदनशीलतेने भरलेले असून अनेकांना विचारप्रवृत्त करणारे ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून त्यांना बहीणाबाई चौधरी यांच्याच नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

प्रा. विद्या कुमरे या गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ग्रामीण, आदिवासी भागातील स्त्रियांमध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि हक्क याबाबत जागरूकता निर्माण केली आहे. त्यांचे लेख आणि कविता समाजमनाशी जुळणारे आणि संवेदना जागवणारे आहेत. त्यांच्या लेखनात बदल घडविण्याची ताकद आहे आणि त्यामुळेच त्या सामाजिक क्षेत्रात प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत.

त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक संस्था, साहित्यिक मंडळी, आणि शिक्षण क्षेत्रातील सहकाऱ्यांनी त्यांचे सत्कार करून सन्मान केला आहे.

बहीणाबाई चौधरी पुरस्कार हा खान्देश विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. कवयित्री बहीणाबाई यांच्या लोकभाषेतील प्रभावी लेखन परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

प्रा. कुमरे यांनी या गौरवाबाबत बोलताना नम्रपणे सांगितले, "ही केवळ माझी नव्हे, तर माझ्या विद्यार्थ्यांची, गावकऱ्यांची आणि माझ्या मातृभूमीची पावती आहे. हा पुरस्कार मला पुढील कार्यासाठी अधिक प्रेरणा देईल."

समाजासाठी लेखणीच्या माध्यमातून झगडणाऱ्या आणि बदल घडवणाऱ्या प्रा. विद्या कुमरे यांचे कार्य खरंच अनुकरणीय आहे..!



Post a Comment

0 Comments