नांदेड (प्रतिनिधी) : झील मॅन्युफॅक्चरिंग अँड कॅलिब्रेशन सर्व्हिसेस प्रा. लि.चे संचालक श्री. विकास राठोड यांच्या उद्योजकीय प्रवासाची दखल घेत त्यांच्या यशोगाथेला श्री गुरु गोबिंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (SGGSIET), नांदेड यांच्या SGGS Icons या प्रतिष्ठित पुस्तकाच्या पहिल्या खंडात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी त्यांनी ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले, त्याच शाळेकडून त्यांना ‘विद्यानिकेतन रत्न’ (Gem of Govt. Public School) या सन्मानाने गौरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि उद्योजकीय प्रवासाला मिळालेला हा दुहेरी गौरव अभिमानास्पद ठरत आहे.
SGGSIET संस्थेने व्यवसाय, अभियांत्रिकी, शिक्षण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रा. रवींद्र जोशी यांनी SGGS Icons या तीन खंडांच्या माध्यमातून संस्थेच्या कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा संकलित केल्या आहेत.
सन २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या पहिल्या खंडात विकास राठोड यांच्या उद्योजकीय वाटचालीला स्थान मिळाले. उद्योगक्षेत्रातील त्यांचे योगदान आणि व्यावसायिक प्रवासाची दखल प्रतिष्ठित संस्थेने घेतल्याने त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.
तसेच मागील वर्षी देखील विकास राठोड यांना त्यांच्या प्राथमिक शिक्षण झालेल्या शाळेकडून ‘विद्यानिकेतन रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ज्या शाळेच्या प्रांगणात त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात झाली, त्याच शाळेकडून मिळालेला हा सन्मान त्यांच्या आयुष्यातील भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला.
SGGSIET ही शासकीय निधीतून चालणाऱ्या अभियांत्रिकी संस्थांमधील एक अग्रगण्य संस्था असून, या संस्थेने हजारो गुणवंत अभियंते घडवले आहेत. आज हे माजी विद्यार्थी देश-विदेशांत विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.
आपल्या मातृसंस्थेकडून मिळालेला हा सन्मान म्हणजे आयुष्यातील अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण असल्याची भावना विकास राठोड यांनी व्यक्त केली. तसेच या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल SGGSIET संस्था आणि प्रा. रवींद्र जोशी यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेपासून ते अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या मातृसंस्थेपर्यंत मिळालेला गौरव हा विकास राठोड यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि यशस्वी वाटचालीचा सन्मान आहे. त्यांचा हा प्रवास नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.
गरजू विद्यार्थ्यांना मदत, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपचे मार्गदर्शन
विकास राठोड हे केवळ यशस्वी उद्योजक म्हणूनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारे आणि नव्या पिढीला प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही कार्यरत आहेत. Give Back Foundation च्या माध्यमातून ते शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करतात. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे महत्त्व समजावून सांगणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या स्टार्टअप प्रकल्पांना दिशा देण्याचे कामही ते करतात. विद्यार्थ्यांमधील कल्पकता, संशोधनवृत्ती आणि उद्योजकीय कौशल्यांना प्रोत्साहन देऊन सक्षम युवा उद्योजक घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
शिक्षण, उद्योग, सामाजिक बांधिलकी आणि युवा उद्योजकांना मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत योगदान देणारे विकास राठोड यांचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्वतः यशस्वी होण्याबरोबरच इतरांनाही यशस्वी होण्यासाठी संधी आणि मार्गदर्शन देण्याची त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे.




0 Comments