मुंबई : महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याच अनुषंगाने त्यांनी आज अप्पर मुख्य सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांची भेट घेऊन वेतनवाढीच्या प्रस्तावाबाबत चर्चा केली.
सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीच्या मागणीसंदर्भात काही दिवसांपूर्वी कामगार आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. या भेटीनंतर कामगार आयुक्तांनी वेतनवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. तसेच, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती.
आजच्या भेटीत वेतनवाढीच्या प्रस्तावाचा आढावा घेत पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. या पाठपुराव्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल आणि दिवाळीपूर्वी वेतनवाढीबाबत गोड बातमी मिळेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीच्या प्रश्नाकडे राज्यातील हजारो सुरक्षा रक्षकांचे लक्ष लागले असून, शासनाकडून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



0 Comments