नाशिक : उप जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी पत्रकार व कामगार प्रतिनिधी सतिष एस राठोड यांनी आजपासून जल व अन्नत्याग आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करत आशीर्वाद घेतले.
उप जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील वेतन अद्याप मिळालेले नाही. अनेक महिन्यांचे वेतन थकीत असल्यामुळे सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या गंभीर अन्यायाविरोधात आवाज उठवत पत्रकार सतिष एस राठोड यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
याबाबत बोलताना सतिष एस राठोड म्हणाले,
“काम करूनही वेतन मिळत नसेल तर हा मोठा अन्याय आहे. सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कांसाठी आणि थकीत वेतन मिळवून देण्यासाठी मी आजपासून जल व अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील.”
उप संचालक आरोग्य सेवा व जिल्हा शल्य चिकित्सक यांची बघ्याची भूमिका
डॉ. कपिल आहेर, उप संचालक आरोग्य सेवा व डॉ. सतिष शिंपी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना दि. ४ मार्च रोजी पत्रव्यवहार करूनही त्यांची बघ्याची भूमिका पहायला मिळत आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन अदा करावे व कामगारांवर होणारा अन्याय थांबवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच समाजातील विविध संघटना, कामगार प्रतिनिधी आणि नागरिकांनी या न्याय लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
उपोषणाचा पहिल्या दिवशी क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे उपाध्यक्ष गजानन साळुंखे, किशोर नागोठणे, कैलास अभंगे व पदाधिकारी तसेच सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत.


0 Comments