सुरक्षा रक्षक मंडळ व आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. प्रलंबित वेतन तात्काळ अदा करावे व पुढील काळात प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमित वेतन अदा करण्याबाबत लेखी आदेश काढावेत. तसेच उपोषण काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सुरक्षा रक्षकांना न्याय द्यावा. - सतिष एस राठोड, पत्रकार (उपाध्यक्ष - क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना)
नाशिक : नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या वतीने आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर अदा होत नसल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने डॉ. कपिल आहेर, उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक परिमंडळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर सुरक्षा रक्षकांनी कोविड काळापासून आजपर्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. मात्र त्यांचे वेतन अनेकदा ३ ते ६ महिने प्रलंबित राहते. त्यामुळे सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून घरभाडे, वीजबिल, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च अशा अत्यावश्यक गरजा भागविणे कठीण झाले आहे. आतापर्यंत कर्ज काढून दैनंदिन जीवन चालवले जात होते; परंतु आता वेळेवर वेतन मिळत नसल्याने कर्जही कोणी देत नाही, त्यामुळे पूर्ण कुटुंबांवर उपासमारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
या संदर्भात संबंधित विभाग व प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस व कायमस्वरूपी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
प्रलंबित वेतन तात्काळ अदा करावे व पुढील काळात प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमित वेतन देण्याबाबत लेखी आदेश काढावेत, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेचे उपाध्यक्ष पत्रकार सतिष एस राठोड यांनी बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक येथे जल व अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे.

0 Comments