Business

सुरक्षा रक्षकांचे शिष्टमंडळ उद्या प्रधान सचिव यांना भेटणार

सुरक्षा रक्षकांचे शिष्टमंडळ उद्या प्रधान सचिव यांना भेटणार

मुंबई : सर्व जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी सुरक्षा रक्षकांचे आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन १७ तारखेपासून चालू आहे,  कामगार विभाग मंत्रालयाच्या वतीने दखल घेतली जात नसून, आज दोन दिवस होऊन सुद्धा संबंधित कामगार विभागाने आंदोलकांना भेट दिलेली नाही. तसेच क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समिती संलग्न सर्व संघटना सदस्य व क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रतिनिधी आंदोलनकर्ते पत्रकार सतिष एस राठोड यांनी सांगितले की जोपर्यंत कामगार विभाग सुरक्षा रक्षकांच्या व्यथा व मागणीची दखल घेत नाहीत, तोपर्यंत लोकशाही मार्गाने व शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन चालूच राहणार, मग त्यासाठी मरण पत्करावे लागले तरी चालेल असे स्पष्ट केले, तसेच उद्या कामगार विभागाचे प्रधान सचिव यांना भेटणार असल्याची माहिती दिली.

सुरक्षा रक्षकांच्या मागण्या खालीलप्रमाणे...

१) मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य सर्व जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ ही रु. ५,००० पेक्षा जास्त त्वरित करण्यात यावी.


२) मा. पंकजकुमार, भा. प्रा. से (विकास आयुक्त, असंघटित कामगार) यांनी दि. ३१ अक्टोबर २०१८ रोजी शासनास सादर केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळांच्या कार्यालयीन कामकाजाबाबत चौकशी अहवालात सुरक्षा रक्षक हे राज्यशासन व केंद्रशासन राबवत असलेल्या अनेक योजना सुविधांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. मा. पंकजकुमार यांच्या अहवालाची अंमलबजावणी करुन त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण करून एकच सक्षम मंडळ स्थापन करण्यात यावे.


३) महाराष्ट्र राज्य सर्व जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून द्यावे. अन्यथा त्यांना बेरोजगार भत्ता देण्यात यावे.


४) सुरक्षा रक्षकांचा पीएफ हा पीएफ कार्यालयातच जमा करण्यात यावा व पेन्शन योजना लागू करण्यात यावी.


५) मंडळ स्थापन झाले वेळी सुरक्षा रक्षकांना जो खाकी गणवेश देण्यात आला होता, तोच गणवेश परिधान करण्याची मान्यता देण्यात यावी.


६) सर्व जिल्ह्यातील शासकीय आस्थापना तसेच इतर विविध आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्यात यावे.


७) सर्व जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांच्या भोंगळ कारभाराची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून पारदर्शकपणे काम चालण्यास मदत होईल.


८) काही संघटना हे सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरतीत हस्तक्षेप करुन, गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांकडून लाखो रूपये  उकळतात, अशा संघटनेवर कारवाई करण्यात यावी.


९) सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत आस्थापनेवर अतिक्रमण करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्यात यावी.


१०) २०२१ या वर्षी अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रीयेचा निकाल जाहीर करण्यात यावे.

Post a Comment

0 Comments