Business

जिवा महाला यांची वंशज प्रतीक्षा महाले हिच्या विवाहासाठी मदतीचा हात

 

जिवा महाला यांची वंशज प्रतीक्षा महाले हिच्या विवाहासाठी मदतीचा हात

लताताई एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रतीक्षा महाले यांच्या विवाहासाठी १ लाख रुपयांचा धनादेश महाले कुटुंबियांकडे वाई येथे सुपूर्द   
प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘योद्धा कर्मयोगी’ या चरित्रग्रंथाच्या पूर्वनोंदणी विक्रीतून जमा झालेल्या निधीद्वारे अर्थसाहाय्य

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक राहिलेल्या जिवा महाला यांचे वंशज महाबळेश्वरमधील कोंढवली गावी राहात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या या वंशाजांच्या १५ व्या पिढीतील प्रतीक्षा प्रकाश महाले हिच्या विवाहासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांच्या पुढाकाराने मदतीचा आश्वासक हात देण्यात आला. लताताई शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाच्या पूर्वनोंदणी विक्रीतून जमा झालेल्या १ लक्ष रुपये रकमेचा धनादेश मंगळवारी वाई येथे महाले कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला.

शिवकाळात आपल्या अपार धैर्याने अजरामर झालेल्या जिवा महाला यांच्या वंशजांच्या १४ व्या पिढीतले प्रकाश महाले हे पक्षाघाताच्या व्याधीने गेल्या काही वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी जयश्री महाले या शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. प्रतीक आणि प्रतीक्षा या दोन अपत्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जयश्री महाले यांनी वाढवले. येत्या १२ मे रोजी प्रतीक्षा महाले हिचा विवाह ठरला आहे. साध्यासोप्या पद्धतीने हा विवाह होणार असला, तरी तेवढाही खर्च महाले कुटुंबासाठी न पेलवणारा होता. ही माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे या महाले कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या. त्यांच्या सुचनेनुसार साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या आगामी चरित्रग्रंथाच्या पूर्वनोंदणी विक्रीतून जमा झालेल्या १ लक्ष रुपये रकमेचा धनादेश गुरुवारी वाई येथे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते महाले कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. तसेच पुस्तकांचे गाव भिलारच्या सरपंच वंदना प्रवीण भिलारे आणि उपसरपंच सुनीता भिलारे यांच्या हस्ते यावेळी जयश्री महाले यांची साडी-चोळी देऊन परंपरागत पद्धतीने ओटी भरण्यात आली. याप्रसंगी विजय बडे, अशोक दादा सूर्यवंशी, तुळशीदास पिसाळ, अरुण सावंत, चंद्रकांत शिर्के, दीपक मांढरे तसेच पत्रकार विश्वास पवार, सचिन ननावरे, भद्रेश्वर भट, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ जयु भाटकर आणि महाले कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याच्या कामी आलेल्या जिवा महाला यांच्या वंशाजांना हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठावे लागणे, ही बाब खेदजनक आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून आम्ही महाले कुटुंबियांना शक्य ती मदत करत आलो आहोत. जिवा महाला यांची १५ वी वंशज असलेल्या प्रतीक्षाच्या शिक्षणाची जबाबदारीही आम्ही कर्तव्याच्या भावनेतून उचलली होती. आता तिचा विवाह होतो आहे, ही आनंदाची बाब आहे, अशी भावना साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी लताताई शिंदे यांनी सुचवल्याप्रमाणे ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या माझ्या आगामी चरित्रग्रंथाच्या पूर्वनोंदणीतून जमा झालेली रक्कम महाले कुटुंबियांच्या या मंगलकार्यास देता आली याचे समाधान आहे, अशी प्रांजळ भूमिका प्रा. डॉ. ढवळ यांनी  यावेळी मांडली.

Post a Comment

0 Comments