Business

वेतनवाढीचा मुहूर्त जवळ आला? सुधारित शिफारस सादर, आघाडीचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!

वेतनवाढीचा मुहूर्त जवळ आला? सुधारित शिफारस सादर, आघाडीचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!

सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा निर्णय लवकरच होणार? फेरशिफारस शासनाकडे सादर; दोन दिवस प्रतीक्षा करण्याचे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचे आवाहन!

मुंबई : सुरक्षा रक्षकांच्या वेतन व भत्तेवाढीचा प्रश्न अखेर निर्णयाच्या टप्प्यावर पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. वेतनवाढीबाबतची सुधारित फेरशिफारस ४ नोव्हेंबर रोजी शासनाकडे पुन्हा सादर करण्यात आली असून, लवकरच यासंदर्भात निर्णय जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचे अध्यक्ष कॉम्रेड उदय भट आणि सरचिटणीस कॉम्रेड दत्तात्रय आत्याळकर यांनी दिली आहे.

सुरक्षा रक्षकांच्या वेतन व भत्तेवाढीच्या मागणीसाठी २० आणि २१ ऑक्टोबर रोजी दोन दिवस साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी वेतन व भत्तेवाढीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आघाडीने आपले साखळी उपोषण आंदोलन स्थगित केले होते.

आंदोलन स्थगित केल्यानंतरही आघाडीने वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. ३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर यांची मंत्रालयात भेट घेऊन वेतन व भत्तेवाढ लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, वेतनवाढीची शिफारस शासनाकडे पाठविण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये काही दुरुस्त्या आवश्यक असल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार दुरुस्त्या करून सुधारित फेरशिफारस ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा शासनाकडे सादर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, फेरशिफारस सादर झाल्यानंतर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आल्याची माहिती आघाडीने दिली आहे.

दोन दिवस प्रतीक्षा, त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा!

सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न आता अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस परिस्थिती पाहून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आवाहन महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीने सुरक्षा रक्षकांना केले आहे.

दिवाळीपूर्वी वेतनवाढीचे आश्वासन देण्यात आले होते. आता सुधारित फेरशिफारस शासनाकडे सादर झाल्याने सुरक्षा रक्षकांच्या नजरा शासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागल्या आहेत. आश्वासनाचे प्रत्यक्ष वेतनवाढीत रूपांतर कधी होणार, हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे.

Post a Comment

0 Comments