Business

बंजारा मौखिक साहित्याच्या संशोधनाला मुंबई विद्यापीठाची मोहोर; एकनाथ राठोड यांची पीएच.डी. यशस्वी, समाजबांधवांकडून सत्कार!

बंजारा मौखिक साहित्याच्या संशोधनाला मुंबई विद्यापीठाची मोहोर; एकनाथ राठोड यांची पीएच.डी. यशस्वी, समाजबांधवांकडून जंगी सत्कार!

शहापूर (ठाणे) :  बंजारा समाजाच्या समृद्ध मौखिक परंपरा, सांस्कृतिक स्मृती आणि संतपरंपरेचे शैक्षणिक दस्तऐवजीकरण करणारे संशोधक एकनाथ चंद्रकला बळीराम राठोड यांनी मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे आयोजित पीएच.डी. अंतिम मौखिक परीक्षा (Defence Viva-Voce) यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर नुकतीच त्यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यासंदर्भातील अधिसूचनाही प्राप्त झाली आहे. त्यांच्या संशोधनामुळे बंजारा समाजाच्या मौखिक ज्ञानपरंपरेला शैक्षणिक संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे. “Constructing the Hagiographies of Saint Sevalal Maharaj and Samki Mata Through Banjara Oral Literature: A Study” असे त्यांच्या संशोधनाचे शीर्षक असून, हे संशोधन मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात प्रा. डॉ. संतोष धर्मा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले आहे.

एकनाथ राठोड यांनी २ जानेवारी २०२१ रोजी पीएच.डी. संशोधनासाठी नोंदणी केली होती. सुमारे पाच वर्षांच्या संशोधन प्रवासात त्यांनी क्षेत्रीय अभ्यास, मुलाखती, निरीक्षण तसेच भजने, लोकगीते आणि मौखिक कथांचे दस्तऐवजीकरण व विश्लेषण केले. त्यांचा संशोधन प्रबंध जुलै २०२६ मध्ये मुंबई विद्यापीठात सादर करण्यात आला.

अंतिम मौखिक परीक्षेसाठी दिल्ली येथील NCERT मधील प्रा. निधी तिवारी बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी बंजारा समाजातील मौखिक ज्ञान, सांस्कृतिक स्मृती आणि पारंपरिक ज्ञानसंपदेचे दस्तऐवजीकरण करून त्यांना शैक्षणिक संशोधनाच्या क्षेत्रात आणल्याबद्दल राठोड यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच या संशोधनाचे प्रकाशन होणे आवश्यक असल्याचे नमूद करून हे ज्ञान व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. टुमकुर विद्यापीठ, कर्नाटक येथील प्रा. एच. के. शिवलिंगस्वामी हे दुसरे बाह्य परीक्षक होते. त्यांनी राठोड यांच्या क्षेत्रीय कार्याचे, मेहनतीचे आणि विषयावरील सखोल अभ्यासाचे कौतुक करून सकारात्मक अभिप्राय दिला. मुंबई विद्यापीठाच्या Department of Lifelong Learning and Extension (DLLE) चे संचालक प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी अंतिम मौखिक परीक्षेचे चेअरपर्सन म्हणून काम पाहिले. त्यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करून संशोधकाच्या प्रभावी मांडणीचे कौतुक केले. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सचिन लबडे यांचेही सहकार्य लाभले.


या संशोधनात संत सेवालाल महाराज आणि सामकी माता यांच्या जीवनकथा, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक स्मृती बंजारा मौखिक साहित्याच्या माध्यमातून कशा जतन केल्या जातात आणि पिढ्यान्पिढ्या कशा हस्तांतरित होतात, याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. २०२१ ते २०२४ या कालावधीत पोहरागड-पोहरादेवी, उमरी बु., फुलऊमरी, सोमेश्वर नगर आणि परिसरातील विविध धार्मिक व सांस्कृतिक स्थळांवर क्षेत्रीय अभ्यास करण्यात आला. यावेळी बंजारा समाजातील ज्येष्ठ व्यक्ती, महाराज, भजन गायक, महिला कथनकर्त्या आणि धार्मिक परंपरांचे जाणकार यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भजने, लोकगीते, कथा आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरांचे दस्तऐवजीकरण करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले.

संत सेवालाल महाराजांच्या मौखिक कथांमध्ये त्यांचे जीवन, आध्यात्मिक जाणीव, समाजप्रबोधन, नैतिक नेतृत्व आणि सामाजिक मूल्यांचे दर्शन घडते. सत्य, सेवा, सहकार्य आणि समाजकल्याण यांसारख्या मूल्यांचे जतन या परंपरांमधून होत असल्याचे संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.

सामकी मातेच्या मौखिक हेजीओग्राफीमध्ये स्त्रीशक्ती, त्याग, मातृत्व, सेवा आणि आध्यात्मिक सामर्थ्य यांचे महत्त्व अधोरेखित होते. विशेषतः महिला कथनकर्त्या बंजारा समाजाच्या सांस्कृतिक स्मृती आणि परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

या संशोधनाचा महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मौखिक साहित्य ही स्थिर परंपरा नसून कथनकर्ता, श्रोते, सादरीकरण आणि सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहणारी जिवंत सांस्कृतिक प्रक्रिया आहे. भजने, लोकगीते, कथा आणि धार्मिक विधी यांच्या माध्यमातून सामुदायिक स्मृती, सांस्कृतिक ओळख आणि पारंपरिक ज्ञानाचे जतन केले जाते. बंजारा समाजाच्या मौखिक ज्ञानपरंपरेचे दस्तऐवजीकरण करून तिला साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभ्यासाच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न या संशोधनातून करण्यात आला आहे. त्यामुळे बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनाबरोबरच भारतीय ज्ञानपरंपरेच्या अभ्यासातही या संशोधनाची महत्त्वपूर्ण भर पडली आहे.

पीएच.डी.ची अंतिम मौखिक परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर पदवीसंदर्भातील अधिसूचना प्राप्त झाल्याने एकनाथ राठोड यांच्या संशोधन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या यशाबद्दल राठोड यांनी आपले मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष धर्मा राठोड, प्रा. डॉ. सचिन लबडे, बाह्य परीक्षक, विद्यापीठातील अधिकारी, बंजारा समाजातील माहितीदार, ज्येष्ठ नागरिक, भजन गायक, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. बंजारा समाजाच्या मौखिक ज्ञानपरंपरेला शैक्षणिक व्यासपीठ मिळवून देणारे हे संशोधन समाजाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आणि भावी संशोधकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

समाजबांधवांकडून सन्मानपूर्वक सत्कार

समाजबांधवांकडून सन्मानपूर्वक सत्कार

एकनाथ राठोड यांनी पीएच.डी. संशोधनात मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजबांधवांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक श्री. अशोक राठोड (नायक, शहापूर), प्राध्यापक श्री. रमेश राठोड (कारभारी), उमेश जाधव (अधीक्षक) आणि विजय राठोड (वरिष्ठ लिपिक) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक करून पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बंजारा समाजाच्या मौखिक ज्ञानपरंपरेला शैक्षणिक व्यासपीठ मिळवून देणारे हे संशोधन समाजाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आणि भावी संशोधकांसाठी महत्वपूर्ण व प्रेरणादायी ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments