नाशिक : आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांचे वेतन ३ ते ६ महिने उशीर तसेच वेळेवर अदा होत नसल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आल्यामुळे सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून घरभाडे, वीजबिल, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च यांसारख्या मूलभूत गरजा भागविणे कठीण झाले आहे. क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री तसेच डॉ. कपिल आहेर, उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक परिमंडळ व नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष विकास माळी यांना संघटनेच्या वतीने ११ मार्चपासून जल व अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष तथा उप आयुक्त विकास माळी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आलेली असून त्या बैठकीत क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे उपाध्यक्ष पत्रकार सतिष एस राठोड व शासकीय जिल्हा रुग्णालयाचे सक्षम अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. मात्र या बैठकीत सुरक्षा रक्षकांच्या बाजूने ठोस निर्णय न झाल्यास दि. ११ मार्च २०२६ पासून जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक येथे जल व अन्नत्याग आमरण उपोषण करण्याची भूमिका कायम राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सुरक्षा रक्षकांचे प्रलंबित वेतन अदा करावे व पुढील काळात नियमित वेतन अदा करण्याबाबत ठोस लेखी आदेश काढावेत, अशी मागणी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राठोड यांच्या वतीने करण्यात आली आहे.


0 Comments