नाशिक : महाराष्ट्र राज्य स्थापित सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक नेमणे नाशिक महानगर पालिकेला बंधनकारक आहे. त्याच माध्यमातून महापालिकेच्या अंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळाचे एकूण ४४१ सुरक्षा रक्षक जलशुद्धीकरण केंद्र, गोदाघाट, मनपा शाळा व इतर आदी ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांचे गेल्या ४ महिन्यांपासूनचे वेतन महानगरपालिकेकडून अदा करण्यात आलेले नाहीत. तसेच महापालिकेकडून वेतन प्राप्त होत नसल्याने ४४१ सुरक्षा रक्षक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. घरखर्च, प्रवासखर्च, मुलांचे शिक्षण यासाठी कर्ज काढून उदरनिर्वाह करण्याची आणि आता अक्षरशः उपासमारीची वेळ आल्यामुळे सुरक्षा रक्षकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.
तसेच सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर अदा करण्यात यावे यासाठी भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन, मोर्चे, केलेली आहेत. तसेच महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. परंतु महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा महिला व पुरुष सुरक्षा रक्षकांवर तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली असून हे आंदोलन शुक्रवार दि. २८ जुलै रोजी, १२:०० वाजता, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड नाशिक येथे करण्यात येत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे अध्यक्ष तथा भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा प्रमुख सचिनभाऊ राऊत यांनी दिली आहे.
0 Comments