Business

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार

 

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येणार असून सफाई कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केला होता.

श्री. सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमार्फत वाहन विराजित यंत्रसामग्रीच्या सहाय्याने यांत्रिक पद्धतीने मलनिःसारण वाहिन्यांचे परिरक्षण करण्यात येते. तसेच मोठ्या नाल्याची सफाई प्रामुख्याने यंत्रसामग्रीचा वापर करून करण्यात येते. परंतु ज्या ठिकाणी यंत्रसामग्री वापरता येणे शक्य नाही, अशा पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई अपवादात्मक परिस्थितीत कंत्राटदारांमार्फत नियुक्त केलेल्या कामगारांच्या सहाय्याने, सुरक्षिततेचे उपाय करून करण्यात येते.

महानगरपालिकेतील 29 हजार 700 सफाई कामगारांपैकी 5 हजार 592 सफाई कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेवासदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भूखंडावर आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकास करून 12 हजार घरे बांधण्याची कार्यवाही महानगरपालिकेतर्फे सुरू आहे. सफाई कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन आहेर, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments